shri chakradhar swami

१७ पुरस्वीकारू How shri Changadev Raul transmigrated soul in to body of Harpal dev

मग माहादाइसीं पुसिलें :“हा जी : तें पुर तेजिलें : मग श्रीचांगदेऊराउळी कवणीकडे बीजें केलें जी?” सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ : तीये समैं भरवसी गुजरातेचेया प्रधानपुत्राचे देह गेलें होतें : तें उठउनि स्वीकरिलें :” माहादाइसी पुसिलें : “तें कैसें जी?” सर्वतें म्हणीतलें : बाइ : प्रधानकुमरासि सातपांच दीस काहीं एकि रुजा जाली’ : मग तेयांचे देह गेलें : माड केले : समसानासि आणिलें होतें : तें उठउनि स्वीकरिलें : वस्त्र हालीनले : वास पाहों लागले : ‘आरे वास पाहातें :’ आणि म्हणीतलें : ‘कूमरू जीयाला जीयालाः'” म्हणौनि वाद्येंत्रे लागली : सर्वज्ञ म्हणीतलें: “प्रधानु सीहाणा चतुरू : कुसळु: तेणे दृष्टी देखतखेओ जाणीतलें : जें हा तो नव्हे : सीधांसाधकांचां ठाइं प्रकायाप्रवेसु असे : तेही भोगाकारणें हें स्वीकरिलें : तैसाचि ‘कुमरू जीयाला जीयाला’ ऐसें म्हणौनि मंगळ वायें वाजीनली : अवघेया नगरांतु गुढीया उभिलीया : पांचपालवीया आणिलीया : पांचपालवीं पंचामृते न्हवण केलें : बरवीं धुवटें वस्त्रे वेढिली : मग दांडीयेवरि आरोहण होउनि नगरामधुनि : कमळा नावं राणी : तेयांचेया आवारासि बीजें केलें : मंगळ तुरें वाजों लागली : तेथही पांचपालवी न्हवण जालें : पाटु पासवडिला : कमळाआउसासी सेसु भरिली : प्रधानें बहुत वेचिलें :” सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ : तो प्रधानु : सीहाणा : चतुरू : कुसळु : तेणें म्हणीतलें : ‘पुरूख जे होती ते राज्याचेनि अभिळाखें स्वीकरिती :’ ऐसा प्रधानासि संदेहो : म्हणौनि तेणें बारां गाउवांचेनि माने भवतें दरेदरकूट : गिरीकपाटें : आडदरे ः कोहंके : तळांमळां नइवाहाळां मढमढीयादेउळे :रानीवनी :कव्हणीं देह ठेविलें असैल:म्हणौनि भवंतें चहूंकडे पाहावीलें : सोधवीलें : तवं तेथ काहीं नेदखतीचि : मग आपुलीए राणीयेकरवि ओव्हारीएतें कमळाउसांतें वीहरणीचीया खुणा पूसीवीलीया : ‘मागीलासारीखें वर्तन की काहीं अनसारिखें?’ तेही ओव्हारी कमळाआउसांतें पुसिलें : ‘मागिलासारिखें वर्तन की काहीं अनसारिखें ?’ तेंही म्हणीतलें : ‘मागिलाचि सारिखें :’ मग प्रधाने बाळलेणे पुसविलें : कमळाराणीयां म्हणीतलें : ‘तुमचे बाळलेणें के आहे ?’ ‘ना उगाणां आहे : ‘ ‘तरि काइ काइ आहे?’ ‘ना अमुकें अमुकें आहे :’ खूण पुरली : एतूलेनि तेयांचा संदेहो नीवर्तला : मग भ्रांति फीटली :” मग सर्वतें म्हणीतलें : “बाइ एथौनि तेयांचे सकळे गुणधर्म स्वीकरिले : गोपाळमंत्री दीक्षा : गोपाळनी आण : राणीएचा पढीयाओ : जुआंचें वेसन : वय : रूप : गुण : उपगुण : बळ : प्राक्रम : जाणीव : सेहाणीव : दाहाही गुण स्वीकरिले :       

सर्वज्ञ म्हणीतलें : बाइ : प्रमेस्वरू सकळही देहधर्म जीवधर्म स्वीकरीति : गोसावीयांपासौनि एकू पुत्रु जाला : तवं गोसावीं तेथ राज्य केलें : ।।       

मग महादाईसाने विचारले, ” श्री चांगदेव राऊळ यांनी ते शरीर त्यागून नंतर काय केले?” त्यावर सर्वज्ञ सांगतात-” बाई त्यावेळी भरूचला गुजरातच्या प्रधान पुत्राचा मृत्यू झालेला होता. त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून त्या मृत शरीराला उठविले. तेव्हा महदाइसा सर्वज्ञाना विचारते की “हे कसे झाले?” उत्तरादाखल सर्वज्ञ म्हणतात की बाई प्रधान कुमाराला सात पाच दिवसांपासून काही एक आजार झाला होता. मग त्याचा मृत्यू झाला. त्याला स्मशानामध्ये आणण्यात आले. मग चांगदेव राऊळांनी त्या देहाचा स्वीकार करून त्या मृतदेहास उठविले. मेलेला राजकुमार जिवंत झालेला पाहून लोकांनी मग त्यास वस्त्र लावून पाहिले. जेव्हा वस्त्र हलले तेव्हा सर्वांनी एकच घोष केला की कुमार जिवंत झाला.

सर्वज्ञ पुढे म्हणतात की कुमाराचा पिता प्रधान हा खूप शहाणा, चतुर आणि कुशल होता. त्याने बघता क्षणीच जाणले कि हा तो नव्हे म्हणजे हा आपला राजकुमार नाही. हा तर कुण्या सिद्ध, साधकाचा या देहाच्या ठाई परकायाप्रवेश आहे. काही भोग भोगण्याच्या उद्देशाने त्यांनी हा देह स्वीकारला. तसाच मंगल वाद्यांचा घोष सुरू झाला. सर्व नगरामध्ये गुढ्या उभारण्यात आल्या. पंच पालव्या आणण्यात येऊन प्रधान पुत्रास पंचामृताने अंघोळ घालण्यात आली. चांगली वस्त्रे त्यास नेसवली. नंतर पालखीत बसवून नगरामधून त्याची राणी कमळा हिच्या महाली नेण्यात आले. तेथेही पंच पालव्यांनी स्नान वगैरे झाले. कमळाईस सेस भरला. अजूनही ग्रामीण भागात लग्ना मध्ये सेस भरण्याची पद्धत आहे. सेस म्हणजे सुवासिनी स्त्रीच्या कपाळावर भलेमोठे कुंकू लावण्यात येते यालाच सेस असे म्हणतात. कामळाऊ चा पती जीवंत झाल्यामुळे तिचा सेस भरण्यात आला. प्रधानाने बहुत दान धर्म केला.

पुढे सर्वज्ञ सांगतात की प्रधान जो होता तो खूप चतुर होता. मृत राजकुमार जीवंत झाला की त्याच्या शरीरात कुण्या दुसऱ्या आत्म्याने प्रवेश केला अशी शंका त्यास आली. प्रधानाने सखोल विचारपूस केली. त्यास वाटले की राज्य करण्याच्या अभिलाषेने कुणीतरी हा देह स्वीकारला. म्हणून त्याने आजूबाजूच्या संबंध प्रदेशातील दऱ्या-खोऱ्यात, गिरी-कंदरात, गुहांमध्ये, निबिड ठिकाणी, मढी-मठांमध्ये शोध घेण्यासाठी माणसे पाठवली.   तिथे कुणी सिद्धीबलाने आपले शरीर त्यागून तर कुणी आपला देह जतन करून ठेवला आहे काय हे तपासण्यासाठी हे सर्व केले.

पूर्वीच्या अनेक घटनांमध्ये अनेक सिद्ध लोक आपले प्राण आपल्या शरीरातून काढून दुसऱ्या एखादया मृत व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करत. त्या आधी मृत झालेल्या परंतु प्राणसंचार झाल्यानंतर जिवंत झालेल्या शरीराद्वारे ते इच्छित कार्य साधण्यासाठी भोग भोगत. आपले कार्य पूर्ण झाल्यावर पुन्हा मूळ शरीरात परत येत. या मधल्या काळात आपल्या निष्प्राण देहाची जपणूक करण्याची व्यवस्था ते चोखपणे लावत. यासाठी जवळच्या अत्यंत विश्वासू शिष्य मंडळींना त्या देहाची काळजी घेण्यासाठी नेमून देत. प्रधानाने असा कुणी देह कुठे जतन केला आहे का हे तपासण्यासाठी हे सर्व केले. परंतु त्या लोकांना असे कुठे आढळले नाही. 

मग त्याने कमळा राणीला जुन्या खाणाखुणा विचारावयास सांगितल्या. प्रधानपुत्राचे मागे जसे वर्तन होते तसेच आहे की नाही? असा  प्रश्न तीस विचारला. तेंव्हा तिने सांगितले की मागे जसे वर्तन होते तसेच आहे. मग राणीकरवी बाळलेणे (बाळपणीचे आवडीचे खेळणे किंवा दागिने) वगैरे माहिती विचारून खात्री करून घ्यायला लावली. जेंव्हा राणीने विचारले की तुमचे बाळ लेणे कुठे आहे? त्यावर हरपाळदेवाच्या रूपातील स्वामींनी सांगितले की या या ठिकाणी आहे. मग राणी परत विचारते की बाळलेणी काय काय आहे? तेंव्हा कुमाराने सांगितले की अमुक अमुक आहे. तेंव्हा राणीची खूण पटली. एव्हडे केल्यानंतर प्रधानाचा संदेह मिटला, भ्रांत फिटली.

मग सर्वज्ञ महदाईसाला म्हणाले की बाई आम्ही त्या प्रधानपुत्राचे सर्व दहा गुण स्वीकारले. जसे

  1. गोपाळ मंत्राची दीक्षा
  2. गोपाळाची आन – म्हणजे गोपाळाची शप्पथ घायची सवय
  3. राणीचा पढीयाओ
  4. जुगाराचे व्यसन – जुगार किंवा द्यूत खेळण्याची सवय
  5. वय,
  6. रूप,
  7. गुण,
  8. उपगुण,
  9. बळ, पराक्रम,
  10. जाणीव आणि शहाणीव (शहाणपण).     

सर्वज्ञ म्हणाले, “बाई, परमेश्वरांनी म्हणजे श्री चक्रधर स्वामींनी त्या देहाचे सर्व देहधर्म, जीवधर्म स्वीकारले. गोसावींपासून एक पुत्र झाला (त्यांचे नाव बहुधा महिपाळ असे होते). तोवर त्यांनी तिथे राज्य केले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: