त्यादिवशी मी ऑफिसमध्ये नेमकच जेवण करून बसलो होतो आणि तेवढ्यात अमितचा फोन आला. आपली आजी वारली. मला नेमकं कळेच ना काही. थोडावेळ तर मी बधिर झालो. एकीकडे सर्वत्र कोरोना चा कहर चालू होता. आणि तू आम्हाला सोडून गेलीस. कालपरवापर्यंत तुला आम्ही धडधाकट पाहिले. तू अशी अचानक एक्झिट घेशील असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. त्यामुळेच मला काही कळेना. कोणाच्याही मृत्यूने डोळ्यात अश्रु न येणारा मी, तुझ्या जाण्याची बातमी ऐकून डोळ्यातून घळाघळा अश्रू यायला लागले. आपोआप. मी लगेच ऑफिसमधून घरी निघालो. पूर्ण रस्ताभर डोळ्यात अश्रू आणि डोक्यात तुझ्या आठवणींचे मोहोळ.
मी अगदी लहान असतानाच्या ज्या काही अर्ध्याकच्च्या आठवणी मला आठवतात त्यात तुझा एक मोठा कप्पा आहे आजी. तु मला आजही आठवते. मी तीन चार वर्षाचा असेंन. मी लहान असलो तरी आई शिवाय राहू शकत असे. तू मला शेतात घेऊन जायची. मला आठवतोय की आपल्याकडे द्राक्षाचा मळा होता या मळ्यामध्ये एक मचाण बनवलेलं होतं. लाकडाच्या शिडीने वरती चढत आणि मला हळुवार जपत तू त्या मचाणावर चढायची आणि मग हातात गोफण घेऊन कितीतरी वेळ त्या द्राक्षाच्या मळ्याची राखण करायचे अधून मधून मला अंगुराचा घोस खायला आणून द्यायची. मी अंगुर खात नसे तेव्हा कृतक रागाने मला रागवायची देखील. म्हणायची कि “मेल्या खा. लोक आपल्या इथे येऊन चोरून द्राक्षे खातात तर तुला खायला काय रोग आलाय?” इतरही अनेक वेळेस जेंव्हा तू मला शेतातून घेऊन फिरायची, तेंव्हा मला जपत जपत तुझी करडी नजर त्या शेतावरती असायची. शेतात कुठं काय आहे हे तुझ्या अनुभवी नजरेनं टिपायचीस. कुणी ऐरा -गैरा बकऱ्या, शेळ्या चारतांना दिसला, लाकूडफाटा तोडताना दिसला तर त्यालाही हुसकावून लावायचीस. आणि अधून मधून जिथं कुठं रानमेवा सापडेल, तो मला गोळा करून द्यायचीस. हे सगळे मला अजून आठवतय. कुठल्याही पक्या शेतकऱ्यासारखा आपल्या शेताचा इंच न इंच तुला माहीत होता. कारण हे शेत, हे रान तूच सांभाळलं होतं. जपलं होतं. तुझ्या लेकरांसारखं.
मी थोडा मोठा झालो. खटल्याच्या या घरात माझ्यासोबत अनेक भावंडं होती. आम्हा सर्व भावंडांना सकाळी तू तुझ्या देखरेखीखालीच खाऊ घालायचीस. हिवाळ्याच्या सुरुवातीसच घरातल्या सर्वांसाठी तू मेथीचे कडू लाडू बनवायचीस. घरातल्या सर्वांच्या शरीराची झिज भरून निघाली पाहिजे हा हेतू. आणि लाडूही तू थोडेथोडके करत नसे. अगदी पेटी भरून. आपल्या घरात असलेल्या मोठ्या लाकडी पेटी मध्ये हे लाडू ठेवलेले असायचे. आणि या खजिन्याच्या किल्ल्या तुझ्याकडे असायच्या. सकाळी आम्ही तोंडं खांगाळली म्हणजे आम्ही तुझ्याकडे लाडू साठी येत असू. तेव्हा त्या लाकडी पेटी उघडून आम्हाला प्रत्येकी एक एक लाडू तू देत असे. कवठाच्या गोळ्या एवढा तो खाऊनही आमचे पोट आणि मन भरत नसे. आम्ही अजून शिल्लक लाडूसाठी तुझ्याकडे हट्ट करत असू. तेंव्हा “चला पळा मेल्यांनो” असं म्हणून तू आम्हाला उडवून लावायचीस. तू वरून कितीही कडक आणि शिस्तीची असली तरी आतून मऊ नारळासारखी होतीस. मग कडक शिस्तीची आजी आणि नातवंडा वर माया करणारी आजी यामध्ये घालमेल व्हायची. शेवटी मायाळू आजीचा विजय होत असे. आणि मग आम्हाला अजून एखादा लाडू मिळत असे. नातवंडांचे फुललेले चेहरे पाहून तुझा ही मन भरून जात असेल कदाचित. त्यानंतर आम्ही अनेक वेळा घरी बनवलेले मेथीचे लाडू खाल्ले पण तुझ्या लाडूंची सर अजून कुणाच्या हाताला आली नाही.
आणि हे केवळ लाडूची बाबतीतच नव्हे. तू बनवलेल्या कुठल्याही पदार्थाला अशीच सर्वांहून वेगळी आणि अप्रतिम चव होती. मग त्या भाज्या असोत, मटणाचा स्वयंपाक असो किंवा चटपटीत खमंग पदार्थ असो. स्वतः महानुभव घरातून आलेली तू, आणि कधीही नॉनव्हेज न खाणारी तू. पण नॉनव्हेज बनवण्यात आतापर्यंत तुझा हात कुणी धरला नाही तुझ्या हातचा मटण खाल्लेल्या आम्हाला दुसरे कुठलेच नॉनव्हेज तेवढे चविष्ट वाटले नाही. तुझा नवरा म्हणजे माझा आजा भारतभर फिरला. सगळीकडे जेवला. पण तेदेखील तुझ्या हाताच्या चवीच् आणि स्वयंपाकाच श्रेष्ठत्व निर्विवाद पणे मान्य करतात. आपल्या घरात स्वयंपाका बाबत सुगरण पदाबाबत अजिंक्य पदाचा मान अजूनही तुझ्याकडेच आहे आजी. ही ट्रॉफी तुझ्याकडून अजून पर्यन्त तरी कोणी जिंकून घेऊ शकलेलं नाही. हे घरातल्या सर्व पुरुष मंडळींचे मत. हा आमचा निकाल आमच्या आया उघडपणे मान्य करायच्या. तर लग्नानंतर आलेल्या आमच्या बायका निमूटपणे मान्य करतात. धिरडे, धपाटे, शेंगोळे, गव्हाच्या पिठाचे रोठ, अनेक प्रकारचे लाडू आणि असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या (ज्या आता कुठे बघायलाही मिळत नाहीत) तु आम्हाला जशा खाऊ घातल्यास तशा नंतर कुठेही खायला मिळाल्या नाही. कधी कधी तू स्वतःसाठी काही खमंग पदार्थ बनवायला लागलीस की आम्ही नातवंडे तुझ्याजवळ गोळा व्हायचो. आणि मग एखादा नवीनच, जगावेगळा पदार्थ, जगावेगळ्या चविसह आम्हाला खायला मिळायचा. कधी वाटलं तर तुझ्याकडे येऊन अनेक वेळा अशा स्पेशल पदार्थांची फर्माईश आम्ही करायचो. आणि तू देखील मनापासून आम्हाला ते पदार्थ बनवून खाऊ घालायचीस.
मी कॉलेजात असताना असतांना मी दर महिन्याला घरी येत असे. जायच्या वेळेस आजी मला काही पैसे खर्ची (पॉकेट मनी) म्हणून देत असे. आणि आवर्जून सांगत असे की याचे काहीतरी चांगलं घेऊन खा. थोडी तब्येत सुधार. मेसचं जेवण कसं आहे ते विचारायची. तिला उत्तर आधीच माहिती असायचं. मग म्हणायची की हे काही पैसे ठेव. आणि एखाद्या दिवशी जेवण चांगलं नसलं तर काही चांगलं घेऊन खा. मी त्या पैशाचं खायला कधीच घ्यायचो नाही. मग पुढच्या वेळेस घरी आलं की ती मग आवर्जून विचारणार. मी खरं खरं सांगितलं की म्हणणार. अरे, तुला खायला प्यायला दिले होते ते पैसे. काही सुकामेवा तरी घ्यायचा त्याचा. पुस्तकात पैसे कशाला घातलेस? तरी पुन्हा पुढच्या वेळेस आवर्जून खर्ची देणार. आजीची मायाच वेगळी होती.
आपल्या घरी तू कधी आलीस आजी याची गोष्ट मला बाबांनी सांगितली. बदनापुर तालुक्यातील मालेवाडी हे तुझं माहेर. तुझ्या गावामध्ये नातेसंबंध असलेल्या भीमराव पाटील बकाल यांच्या सोबत माझा आजा कधीकधी या मालेवाडी ला यायचा. भीमराव पाटील म्हणजे आजोबांचे दाजी (भावोजी). तेव्हा भीमराव पाटलांच्या मध्यस्थीने माझ्या आज्या सोबत तुझ्या लग्नाचा प्रस्ताव आला . आमच्या पणजोबानाही मुलाच्या लग्नाची भारी हौस होती. त्यामुळे हे लग्न ठरलं. बारा पंधरा बैलगाड्यांमध्ये वर्हाड गेलं. परकर पोलके घालणारी पाच वर्षाची पोर होतीस तू. तेव्हा नवरा मुलगा आठ-दहा वर्षांनी मोठा. या लग्नामध्ये वडीलधाऱ्यांचा कडेवर बसून सगळीकडे मिरवलीस. काहीही न कळण्याच्या वयामध्ये गावंडे परिवारात तू सून म्हणून आलीस. माझ्या पणजीने म्हणजे तुझ्या सासूने खूप जीव लावला तुला. लहानपणी तुला न्हाऊ घालावं, माखावं, वेण्या बांधून द्याव्यात, जेऊ घालावं, असं सगळं काही केलं. त्यामुळे हे सासर आहे असं तुला कधी वाटलंच नाही. हे आपलंच घर आहे आणि ही आपलीच माणसं आहेत हे तुझ्या मनात पक्क बिंबलेलं होतं. अगदी शेवटपर्यंत.
तू या घरची सून बनून आल्यावर काही वर्षांनी आपल्या वाड्याचं बांधकाम सुरू करण्यात आलं. घरातल्या सर्वांसोबत, कमरेला पदर खोचून, एक एक वीट, गारा, चिरा (दगड) रचून हे घर तू बांधू लागलीस. घराच्या वास्तूला तुझा हात लागला. फक्त घरालाच नाही तर या घराण्याच्या बांधणीतही तुझा हातभार लागलेला आहे आजी. भल्या पहाटे चार वाजता उठून जात्यावर दळण दळून ठेवायचे. घरा सहित अंगण झाडून घ्यायचे. सडा टाकायचा. रांगोळी काढायची. त्यानंतर घरासाठी लागणार पाणी आडातून शेंदून उपसून भरून ठेवायचं.आधी आपण आवरायचं. सगळ्यांच्या अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था करायची. सगळ्यांच्या भुकेच्या वेळेआधी न्याहारी ची व्यवस्था करून ठेवायची. शेतात जाणाऱ्या माणसांच्या आणि सालगाड्यांच्या न्याहऱ्या बांधून द्यायच्या. नंतर घरचं सगळं आवरून घ्यायचं. मजूर बायका पोचण्याचा आधी शेतात जायचं. दिवसभर बायकांवर लक्ष ठेवायचं. त्यांच्यासोबत कामदेखील करायचं.
घराचा तसाच शेताचाही कारभार तसा खूप मोठा होता. थोडाथीडका पसारा नसायचा हा. सासू सासरे, नवरा, दीर, जावा, नंदा अशी सगळी मंडळी. अशा सगळ्या खटल्याचं पूर् नि पूर तू बघितलंस. दिवसेंदिवस हा गोतावळा वाढतच गेला. तुलाही सहा लेकर झाली. चार मुलं आणि दोन मुली. या सहा लेकरां सोबतच तुझ्या बहिणींच्या लेकरांना (उदा. राधा आत्या, दत्तू काका) तू सांभाळलस, शिकवलस. मोठी केलस . घरच्या माणसांसोबतच दहा-बारा सालदार आणि गडी हे ठरलेलेच. येणारे असंख्य पै पाहुणे याच्या जोडीला होतेच.
नवरा राजकारणात पडल्यावर तर येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या खूप वाढली. बाबांसोबत (नवऱ्यासोबत) वेळी-अवेळी येणाऱ्या या पाहुण्यांना रात्र-दिवस न पाहता गरम गरम स्वयंपाक रांधून पोटभर जेवू घातलस. बिना तक्रार! कुठलीही कुरकुर न करता. हे सगळं व्यवधान तू सहजपणे कसं सांभाळालस आजी? तुझ्या हातची भाजी-भाकरी खाऊन गोपीनाथ मुंढे, प्रमोद महाजन, जयसिंग मामा गायकवाड वगैरे मंडळी मोठी झाली. देशाचा कारभार पहाण्याइतकी मोठी झाली. जेंव्हा जेंव्हा ते चितेगावला, बाबांना भेटायला आले तेंव्हा तेंव्हा माजघरात येऊन तुझी आपुलकीने खबरबात त्यांनी घेतली नाही असं कधी झालं नाही. मनापासून. इतका जीव तू या सगळ्यांना लावलास. त्यांच्यासारखे असंख्य कार्यकर्ते (संघाचे आणि पक्षाचे) बाबांनी घडवले. ते बाबांचे जेवढे ऋणाइत होते तेवढेच तुझे देखील होते.
तरुणपणी बाबा जेंव्हा राजकारणाच्या मागे लागले. संघाचे आणि जनसंघाचे काम करण्यात ते दिवसेंदिवस बाहेर राहू लागले. मोठ्या दिराचा या सर्वाला विरोध आहे हे तू पाहिलेस. नवऱ्याच्या वाटयाचं काम अडू नये, त्याबद्दल त्याला कोणी बोल लावू नये यासाठी घरातली त्यांची सर्व जबाबदारी तू सांभाळलीस. पुढे नवरा राजकारणात मोठा होत जाताना, या धामधुमीत, घराची कारभारी तूच झालीस. बाबा (नवरा) असे महिना महिना घराकडे लक्ष न देता पक्षासाठी वेळ देत होते. त्यावेळेस घराचा गाडा समर्थपणे तू तुझ्या हाती घेतलास आणि मार्गी लावलास. घरची सगळी शेती तू सांभाळून घेतलीस. शेतात काय लावायचं, कुठे लावायचं हे ठरवण्या पासून सारे निर्णय तू घ्यायचीस. शेताची मशागत साल गाड्यांकडून आणि मजुरांकडून करून घ्यायची. पिकांची सगळी निगा राखायची. शेवटी कापणी झाल्यावर खळ्यावर धान्य काढून पोत्यांमध्ये, बळदामध्ये भरून घ्यायची. एवढं सगळं पुरं पडणार नाही हे पाहून एक पिठाची गिरणी देखील टाकून घेतलीस शेतामध्ये. तिचाही व्यवहार चोख सांभाळालास. तुझा व्यवस्थित कारभार बाबांच्या लक्षात आला. म्हणून ते देखील निश्चिन्त मनाने राजकारणात लक्ष घालण्यासाठी बाहेर पडायचे.
धनधान्य, भाजीपाला, मीठ-मिरची, मसाले, वडे,पापड, कुरडयांचे वाळवण अशी सर्व वर्षभराची पूर्ण बेगमी तू करून ठेवायचीस. न चुकता, न आळस करता. अशिक्षित असतानाही एव्हढं व्यवस्थित मॅनेजमेंट तू कुठून शिकलीस? आज याचं मला नवल वाटतं. पुढे मी थोडा मोठा झाल्यावर शिवचरित्रात जिजाउबद्दल वाचलं, की जिजाऊंनी देखील शहाजी राजे नसतांना समर्थपणे जहागिरीचा कारभार सांभाळला आणि राज्याची घडी नीट बसवली. तेंव्हा तुझी आठवण होऊन अभिमानाने छाती भरून आली. तु शिकलेली नव्हतीस तरीही बदलत्या काळाचा वेग ओळखून तू मुलांच्या शिक्षणासाठी धडपडलीस. पदराला खार लावून मुलांना चांगले शिक्षण दिलेस आणि मोठे केले. सुना आल्यावर देखील कित्येक वर्ष घराच्या कारभारणी ची भूमिका आणि घराचे सर्व व्यवस्थापन तूच सांभाळलेस. सुनांना देखील आपल्या दाराऱ्याने, कडक शिस्तीने आणि स्वतः काम करण्याच्या उदाहरणातून तू घर कसं सांभाळायचं याचे वळण लावलेस. पुढे सुनांच्या हाती कारभार गेल्यावर देखील सणा सुदीची साफसफाई, महालक्ष्मी, लग्नसराई अशा अनेक कामात तुझ्या मार्गदर्शनाशिवाय त्यांना पुढे जाता यायचं नाही.तुझ्या सुनांनी हे सगळं पाहिलेल होतं. चौघी सुना असून देखील हे सर्व पेलणे त्यांना जड जायचं. त्यांना तुझ्या या कर्तबगारीची जाणीव होती. पण फार नंतर आलेल्या तुझ्या नात सुनांना या कर्तबगारीची माहिती कोण सांगणार?
पण एक मात्र खरं. बाबांचे राजकारणी म्हणून जे काही यश आहे, त्यात फार मोठा वाटा आजी तुझा आहे. राजकारणी माणूस पूर्ण वेळ राजकारण तेव्हाच करू शकतो जेव्हा त्यांच्या घरचे वडीलधारी माणसं, भाऊबंद ही घरची आघाडी सांभाळून असतात. परंतु बाबांच्या बाबतीत असं होणं शक्य नव्हतं. घर वाऱ्यावर सोडून हा माणूस पूर्णवेळ पक्षासाठी देशभर फिरला. त्याला कारण म्हणजे घरची आघाडी अत्यंत खंबीरपणे आणि हिमतीने तू सावरून धरली होतीस आजी. शिक्षण नसले तरी व्यवहारीक शहाणपणा भरपूर होता तुझ्यामध्ये. अनेक शिकलेल्या बायकांपेक्षा देखील जास्त. घरादाराचे, शेतीचे, व्यवस्थापन तू व्यवस्थितपणे सांभाळले. नवऱ्याचे राजकारण, मुलांचे संगोपन आणि शिक्षण, येणाऱ्या जाणाऱ्या पै पाहुण्यांची सरबराई आणि मानपान, आणि कुलपरंपरेचा सांभाळ या सर्वांना सांभाळून ही तारे वरची कसरत लीलया करून दाखवली.
सुनांच्या हाती संसार सोपविल्यानंतर तू थोडी मोकळी झालीस. थोडं बाहेर फिरायला लागलीस. मी चार पाच वर्षाचा असेल बहुतेक. तेव्हापासून मला सोबत घेऊन तू निघायचीस. असेच कुठल्यातरी पाहुण्यांकडे आपण जायचो. तुझी बहीण, पुतणी किंवा भाचीच्या घरी. तिथे गेले की सर्वजण जिव्हाळ्याने तुझ्या भोवती गोळा व्हायचे, बोलण व्हायचं, सुखदुःखाच्या गोष्टी सांगितल्या जायच्या. सर्वांची विचारपूस व्हायची.अडचणीत तू त्यांना मार्गदर्शन करायची. एखादीचा मुलगा किंवा एखादीची सून नीट वागवत नसेल तर तू हक्काने तिची कानउघडणी देखील करत असे. सर्वांच्या सुखदुःखाची अशी तू सांगाती होतीस. हे सगळं झाल्यावर जणू काही घडलंच नाही अशा अविर्भावात तू वावरायचीस. जेवण खाण बनवतांना घराच्यासारखी तू ही सहभागी व्हायची. जेवणं आटोपली की थोडा वेळ पुन्हा गप्पा मारल्या जायच्या. आणि मग असा हा जिव्हाळा आणि आठवणी सोडून तू तिथून दुसरीकडे निघायचीस. मला घेऊन.
बरं तुला कुठे कसं जायचं हे सगळे ठाऊक. खेडोपाडी जाणारे रस्ते जणू मुखपाठ. एखाद्या वेळेस गाडी मिळाली नाही तर तू हिमतीने पायीच निघायचीस. आडवाटेचे, शॉर्टकट चे, पाऊलवाटांचे, पांद्या चे सर्व रस्ते तुला माहित होते. कुठल्याही गाडी घोड्याची वाट न पाहता तू ठरलेल्या मुक्कामाकडे कूच करत असे. कधी मला पायी चालवत तर कधी कडेवर घेऊन. आणि मग रस्त्यात जर एखादी गाडी किंवा बैलगाडी मिळाली तर त्यातही आपण दोघे बसून जात असू. मग पुन्हा नवीन नातेवाईकाच्या घरी. पुन्हा भेटीगाठी आणि पुन्हा गप्पा-छप्पा. तुझ्या जिव्हाळ्याच्या लोकांची तुझी खास अशी वेगळी प्रभावळ असे. अशा भेटींमध्ये तू अनेकांचे संसार मार्गी लावले, अनेकांना आर्थिक हातभार लावला, अनेकांच्या अडचणी आपल्या व्यावहारिक शहानपणाने आणि अनुभवाने दूर केल्या.
तू किती हिमतीची आणि धोरणी होतीस याचा एक किस्सा मी ऐकला. आपल्या एक पाहुण्यांपैकी असलेल्या एका मामांचे अपघाती निधन झाले. मागे मामी, एक मुलगा आणि एक मुलगी असं कुटुंब. मुलांचे शिक्षण झालेले. मुलीचे लग्नही झालेले. मुलगा नोकरीस लागलेला. घराचा मोठा व्यवसाय होता. स्थावर-जंगम संपतीही होती. पण नवरा गेल्यावर मामी खचल्यासारख्या झाल्या. आजी तू त्यांना भेटायला गेलीस. थोड्याच वेळात तुला एकंदर परिस्थितीचा अंदाज आला. आणि मग ज्याला मूर्तिमंत शहाणपण म्हणता येईल असा सल्ला तू मामींना दिलास. म्हणालीस-
“अगं! अशी काय हतबल होऊन बसलीस? किती दिवस अशी बसणार? किती दिवस दुःख करणार? यातून बाहेर पड. तुम्ही दोघांनी एवढा संसार उभा करून ठेवला तो सावर. व्यवसायावर लक्ष दे. पुन्हा कामाला लाग. तुला सगळं काही करता येतं. अशी शुंभासारखी बसू नकोस. मुलाला तुझ्याजवळ बोलावून घे.”
मामी तरीही हतबलच. कसं करावं त्यांना काही सुचेना. त्यांनी विचारलं “मुलाची नोकरी चालू आहे. त्याला इकडे कसं बोलावू ?” आजी म्हणाली – अगं वेडी झालीस काय? लाखोंची उलाढाल असलेला व्यवसाय आहे. तो काय वाऱ्यावर सोडणार आहेस? मुलाला इकडे बोलावून घे. नोकरी सोड म्हणावं त्याला. त्याचं लग्नाचं वय झालंय. चांगली मुलगी पाहून दोनाचे चार हात कर त्याचे. मुलगा आणि सुनेला घेऊन रहा चांगली इथेच. अंगं तू आजारी पडलीस, म्हातारी झालीस तर कोण आहे तुझं बघायला?”
आणि यावर मामीचे डोळेच उघडले. आज आजीच्या सल्ल्यानुसार वागणाऱ्या मामीचे सर्व सुरळीत सुरू आहे. आजीच्या या शहणपणावर मामीची पावती काय? मामी म्हणाल्या, “एवढी शिकलेली मी, पण जेंव्हा मला काहीच सुचत नव्हतं तेंव्हा आजीच्या शब्दांनीच मला भानावर आणले. आजीचा शहाणपणाचा सल्लाच मला कमी आला.” अशा अनेकांचे संसार आजीने आपल्या मदतीने आणि मार्गदर्शनाने मार्गी लावले.
एवढे कष्ट तू सर्वांसाठी उपसले परंतु थोडा विसावा, थोडा विरंगुळा, हौस-मौज हे काहीच तुझ्या वाट्याला आले नाही. एका आमदारची बायको असून देखील तू कधीच तोऱ्यात वागली नाहीस. अत्यंत मोठा मान मिळाणे तर सोडूनच द्या पण पत्नी म्हणूनही तुझा हक्काचा असलेला, न्याय्य मान तुला मिळालाच नाही. टी कधी तक्रार केली नाहीस. पन मग कधीकधी तु बाबांवर रुसायची. राग काढायचीस. नवरा म्हणून त्यांना सर्व काही हक्काने सुनवायचीस. पण ते देखील एका मर्यादेत. साऱ्या परंपरा प्रतिष्ठा आणि नवऱ्याचा मान मरातब सांभाळून. आम्हाला लहानपणी हे कळायचं नाही. एकदम चांगली असलेली आजची आज, अचानक आजोबांवर का कोपली आहे? पण जसजसा मोठा होत गेलो आणि काही गोष्टी समजत गेल्या तसतसा या गोष्टीचं कारण देखील कळायला लागलं.
माझी आसामला पोस्टिंग झाल्यावर बाबांना आणि तुला आसामला माझ्याकडे फिरायला घेऊन गेलो . त्यावेळेस तुझ्यासोबत निवांत वेळ घालवता आला. मनसोक्त गप्पा मारता आल्या. यातून हळू हळू आमची आजी काय चीज आहे हे उलगडत गेले. मग तू अधून मधून बाबांवर नाराज का व्हायची ते देखील काळायला लागले. बाबा गमतीने कधी तुझी चेष्टा करायला लागले की तुला राग येतो हे आम्हाला माहीत झालं होतं. आता अशावेळी मी आणि केतकी तुझ्या बाजूने बोलायचो. बाबांचं बोलणं कसं चूक आहे याबाबत आम्ही तुझ्या बाजुने वकिली करायचो. आपल्या बाजूने कुणीतरी बोलतोय, आपली भूमिका, आपले कष्ट याची कोणीतरी दखल घेतय हे बघून तू सुखावलीस. मनाने अजून मोकळी झालीस.
ते दोन महिने खूप आनंदाचे आणि समाधानाचे होते तुझ्यासाठी. आसाम ला जातानी आपण सर्व रेल्वेने गेलो आणि दोन महिन्यानी परत येताना विमानाने आलो. मधल्या काळात तिकडे आसाम मध्ये ब्रह्मपुत्रा ची सफर आपण बोटीने केला. आमच्यासाठी या गोष्टी आम्ही सहज म्हणून केल्या. परंतु नंतर कोणाजवळ तरी तू म्हणालीस की- “एवढा मोठा माझा नवरा. त्याच्यासोबत कधी मला फिरायचा योग आला नाही. जिल्हयाबाहेर मी कधी पडले नाही. माझा नातवाने मात्र मला भरपूर फिरवले. चार राज्य ओलांडून महाराष्ट्राच्या बाहेर मला नेले. रेल्वेचा प्रवास घडवला विमानाचा प्रवास घडवला जहाजाने देखील फिरवले. लाल दिव्याच्या गाडीत बसवलं. नॉर्थ ईस्ट मधली चांगली चांगली ठिकाणे आणि मंदिरं दाखवली”. खरच, तेंव्हा जाणवलं की किती छोट्या छोट्या आणि साध्या अपेक्षा देखील पूर्ण झाल्या नव्हत्या तुझ्या. या सर्व प्रवासात तुझा उत्साह आणि आनंद बघण्यासारखा होता आजी. आसाम मध्ये तुला चहाचे मळे दाखवले तेव्हा मोठ्या अपूर्वाईने तू ते सर्व बघत होतीस. चहा बनवायचे फॅक्टरीमध्ये तुला घेऊन गेलो. तेव्हादेखील उत्सुकतेने तू सर्व काही बघत होतीस. प्रश्न विचारत होतीस. समजून घेत होतीस.
अशाच एका निवांत दिवशी मी तुला माझे ऑफिस दाखवण्यासाठी घेऊन गेलो मोठ्या अपूर्वाईने आणि अभिमानाने तु सर्व पाहिलेस. मोठी केबिन होती माझी. समोर मोठा टेबल आणि माझ्या पदाला साजेशी अशी मोठी खुर्ची. मध्येच मी तुला माझ्या खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला. तु लाजलीस. आधी नकार दिला. पण मग मी आणि केतकी जास्त आग्रह करू लागलो तेव्हा तू कशीबशी खुर्चीवर बसण्यास तयार झालीस. तुला खुर्चीत बसवल्यानंतर मग मी तुला म्हणालो, “आजी, आता खरं तू आमदाराची बायको आणि कलेक्टर ची आजी शोभते आहेस”. आणि तू हसलीस. अभिमानाने भरून पावलीस. जणू काही तुझ्या अंगावर मूठभर मांस चढले. आम्हा दोघांनाही आनंद झाला.
कधी दूरचा प्रवास केलेला नसून देखील नवा प्रदेश, नवे लोक, वेगळी भाषा, वेगळे अन्नपदार्थ या सर्वांशी तू सहजतेने जुळवून घेतले. आमच्या घर मालकिणीने जेव्हा तुला जेवायला बोलावले तेव्हा वाटले, की आजीला हे कसं जमणार? कारण तू हिंदीत बोलायला लाजायचीस आणि आमच्या घर मालकिणीला तेवढे चांगले हिंदी येत नसे. पण तू ज्या सहजतेने तिच्याशी संवाद साधला ते पाहून मनातल्या मनात तुझे कौतुक वाटले. म्हटलं- आपली आजी हुशार आहे खरी.
तुझा नात सुनेशी, केतकीशी देखील तुझं चांगलं मेतकुट जमलं. तिच्यासोबत दिवसभर गप्पाटप्पा, संध्याकाळचे चहापान, आणि नंतर थोडेसे बाहेर फिरायला जाणे, संध्याकाळचा हरिपाठ, जेवणाची तयारी, तिला नवीन नवीन व्यंजने शिकवणे या सर्वांमध्ये तुम्हा दोघींचा दिवस छान जात असे. संध्याकाळच्या या बैठकीत तिला तू अनेक वेळा भक्तीपर गाणी, भजनं, ओव्या, जात्यावरच्या ओव्या, उखाणे असे खूप काही शिकवले. सर्व काही लक्षात राहणार नाही म्हणून तिने काही गोष्टी रेकॉर्ड देखील करून ठेवल्या. नंतर मुंबईलाही काही दिवस निळू आणि अंजलीसोबत, तू आणि बाबा माझ्याकडे आले. आमच्यासोबत किहिमच्या समुद्रकिनारी फिरायला आलीस. मोठया अप्रुपाने किहीम बीच पाहिलास. महाड आणि पालीच्या गणपतीचे दर्शन घेतलेस. आठवडाभर राहून बाबांसोबत तु परत गेलीस. पन असे निवांतपणाचे क्षण मोजकेच आले तुझ्या आयुष्यात.
मागे बाबांच्या सहस्त्र चंद्र दर्शनाचा कार्यक्रम झाला. सर्व लोक बाबांबद्दल बोलत होते. तेव्हा मी देखील बाबां विषयी बोलणार होतो. तसाच तुझ्या बाबत देखील बोलणार होतो. तुझा योगदानाचा गौरव करणार होतो. परंतु त्या कार्यक्रमांमध्ये बाबांच्या राजकीय मित्रांची भाषणातील जुगलबंदीची इतकी रंगली की मला बोलण्याची संधीच मिळाली नाही. त्या सत्कार समारंभाचे नायक बाबा असले तरी नायिका खरं तर तू असायला हवी होतीस. तुझा मात्र सगळ्यांना विसर पडला. खरं तर तुझा स्टेज वर बोलावून सत्कार करायला पाहिजे होता आम्ही. काही गोष्टी करायच्या राहिल्याच खऱ्या!
कधी कधी मला वाटतं की आजीचं आयुष्य म्हणजे जणू काही संत तुकारामाच्या अवलीचे प्राक्तन. संत तुकारामाच्या आवलीचं जसं झालं तसंच आजीच्याही वाट्याला आलं. काय म्हणून केलं नाही तिने तुकोबांसाठी? या आवलीने देवभक्तीत रंगलेल्या, घर-संसार विसरलेल्या तुकारामाची संसाराची सगळी आघाडी सांभाळली. भांडाऱ्याच्या डोंगरात काटे कुटे तुडवीत तुक्याच्या भुकेची भाकर झाली. महिनोन्महिने नामस्मरणात दंग तुकोबांचा संसार सांभाळला. पोराबळांचे सर्व काही पाहिले. तुकाराम महाराज वारीला गेल्यावर त्यांच्या येण्याची वाट पहात सर्व कर्तव्ये पार पाडली. आलेल्या संतमंडळींना कोंड्याचा मांडा करून खाऊ घातले. अडचण असून देखील नवऱ्या साठी मावंदे देखील घातले. गाभण जनावरांची आई झाली. एवढेच काय त्यांच्यासाठी वैकुंठाचा मोह टाळला. सर्वांना तिचा राग दिसला पण त्याग मात्र दिसला नाही. तुकाराम संत बनून सर्वांच्या नमस्कारास पात्र झाले. पण आवली मात्र उपेक्षितच राहिली. तुझीही कहाणी काहीशी अशीच आहे आजी. तूझ नाव चंद्रभागा. विठुरायाच्या गजरात चंद्रभागेच्या वाळवंटाकडे कुणाचं लक्षच गेलं नाही आजी.