First Statue of Shivaji Maharaj in world शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे उभारला?

नुकताच औरंगाबाद येथे क्रांती चौकामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा भव्य आणि सुंदर पुतळा बसविण्यात आला या पुतळ्याचे अनावरण शिवजयंतीच्या दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारीला करण्यात आले. तमाम मराठवाड्यातील मराठी मंडळींना क्रांती चौकातील हा नवा शिवाजी पुतळा म्हणजे आपल्या अभिमानाचे, अस्मितेचे प्रतीक वाटत आला आहे. जुना पुतळा सुंदर होताच. नवीन पुतळा देखील सुंदर आणि तितकाच भव्य देखील आहे

आज आपण जर रायगडावर गेलो तर तिथे सिंहासनाची जागा आहे. पूर्वी तिथे फक्त एक चौथरा होता. रायगडावर सिंहासनाच्या जागेवर आज जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो फार नंतरच्या काळात बसवण्यात आला.मग शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कोणी बनवला आणि कुठे बसविण्यात आला?

अभिमानाची गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा महाराष्ट्रातच  बनवण्यात आला.  ब्राँझ  धातूचा. या पुतळ्याची जन्मकथा फार रोमहर्षक आहे. आणि ब्राम्हण-ब्राम्हणेतर वादाच्या पार्श्वभूमीवर त्या मागचा इतिहास देखील तेवढाच गंभीर आणि विचारणीय आहे.या पुतळ्याची जन्मकथा समजून घेण्यासाठी तात्कालीन सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी त्याआधी समजून घेणे आवश्यक आहे.

तत्कालीन राजकीय परिस्थिति

भारताच्या राजकीय पटलावर विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत लोकमान्य टिळक मोठाच प्रभाव होता. त्यांची गणना त्या काळात मोठ्या राष्ट्रीय नेत्यांमध्ये होत होती. किंबहुना ते सर्वात ज्येष्ठ आणि महत्त्वाचे राष्ट्रीय नेते होते. लोकमान्यांच्या राष्ट्रीय चळवळीच्या राजकारणा सोबतच महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित सत्यशोधक चळवळीला हळूहळू राजकीय स्वरूप येण्यास सुरुवात झाली होती. यामुळे महाराष्ट्राच्या एकूण राजकीय आणि सांस्कृतिक अवकाशात ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर असे उघड दोन गट पडलेले होते. 

नव्या शतकास सुरुवातच झालीच होती. तेवढयातच १९०१ सालाच्या दिवाळीमध्ये ‘वेदोक्त प्रकरण’ उद्भवले आणि महाराष्ट्रात ब्राम्हण ब्राम्हणेतर वादाला तोंड फुटले होते. या प्रकरणानंतर शाहू महाराजांनी सामाजिक सुधारणे सोबतच आपले सगळे राजकीय वजन आणि शक्ती फुले विचारांच्या सत्यशोधक समाजाच्या पाठीमागे आणि पर्यायाने ब्राम्हणेत्तर पक्षाच्या मागे उभी केली. यावरून महाराष्ट्रात जो अभूतपूर्व वाद घडून आला. या वादामध्ये लोकमान्य टिळकांनी जी भूमिका घेतली त्यामुळे ब्राम्हण ब्राम्हणेतर वादात ब्राम्हण गटाच्या राजकारणाला टिळकांचा पाठींबा मिळाला.

वेदोक्त प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी इथे वाचा

तर अशा दोन वेगवेगळ्या राजकीय आणि वैचारिक आघाड्या आणि दोन खंबीर नेते त्यांच्या पाठीशी उभे ठाकले. असे असताना पुढे पटेल विधेयकावरून परत एकदा या दोन गटांमध्ये विवाद उद्भवला. हे विधेयक स्त्री शिक्षण आणि आंतरजातीय विवाह यातून उद्भवणाऱ्या संतती यासंबंधीचे होते. टिळकांनी या विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली. त्यासंबंधी जेव्हा लोकमान्य टिळकांनी सभा घेण्याचे प्रयत्न केले तेव्हा काही ठिकाणी ब्राह्मणेत्तर पक्षांनी या सभा उधळून लावल्या.

ताई महाराज खटला आणि चिरोल प्रकरणाने देखील या दोन गटात विरोध वाढला. व्हॅलेंटाईन चिरोल या ब्रिटिश लेखकाने Indian Unrest नावाचे पुस्तक लिहिले होते. टिळकांनी त्याच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला होता.  या चिरोल महाशयांना पुस्तक लिहिण्यासाठी कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी सर्वतोपरी सहाय्य केले, एवढेच नव्हे तर या पुस्तकाचे भाषांतर करून ते सर्वत्र वाटले असे टिळक पक्षाचे म्हणणे होते. चिरोल प्रकरणामुळे टिळक पक्ष आणि शाहू महाराजांचा पक्ष आणि पर्यायाने ब्राह्मण-ब्राह्मणेतर गट यामध्ये अजून वितुष्ट आले. वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानातील कुलकर्णी वतने नष्ट केली होती याचादेखील मोठा वाद झाला.

1 ऑगस्ट 1920 साली टिळकांचे निधन झाले.

टिळकांच्या निधनानंतर ह वाद अजूनच वाढत गेला. केसरी वर्तमानपत्राने ‘छत्रपती व इंग्रज यांचे हितगुज’ या नावाचा लेख केसरी मध्ये 17 मे 1921 रोजी छापला. या लेखमाले मध्ये छत्रपती शाहू महाराज हे इंग्रजांचे कसे पाठीराखे आहेत आणि त्यामुळे राष्ट्रीय चळवळीच्या विरोधी कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला  होता. दिनांक 15 आणि 16 मे रोजी बेळगाव येथे ब्राह्मणेतर परिषद भरणार होती आणि लगेच 18 मे 1921 ला तासगाव येथे कुळकर्णी परिषद भरणार होती. अशा महत्त्वाच्या दोन घडामोडी मध्ये 17 मे रोजी चा मुहूर्त साधून मुद्दामून हा लेख केसरी मध्ये छापण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असून देखील शाहू महाराज हे इंग्रजांच्या बाजूने व राष्ट्रीय चळवळीच्या विरोधी कसे उभे आहेत असा या लेखाचा सूर होता

या लेखाचे प्रत्युत्तर म्हणून ‘जागृती‘ या ब्राह्मणेतरांच्या पत्राने 18 मे रोजी ‘स्वजन द्रोही केसरी’ या मथळयाखाली लेख छापला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असूनदेखील जेव्हा धार्मिक विधीच्या अधिकाराचा प्रश्न येतो तेंव्हा शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या याच शाहू महाराजांना कसे शुद्र ठरवण्यात येते आणि या प्रकरणाला ‘केसरी‘ गटाकडून कसे समर्थन प्राप्त होते याचा राग ब्राह्मणेतर गटात होता.

छत्रपती शाहू महाराजांची तयारी

पुण्यामध्ये शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक असावे अशी शाहू महाराजांची खूप आधीपासून  इच्छा होती. याच स्मारका सोबत बहुजन समाजासाठी एक शिक्षण संस्था देखील असावी असे देखील त्यांचे स्वप्न होते. या एकंदर पार्श्वभूमीवर या त्यांच्या स्वप्नास इतर मराठा संस्थानिकांनी देखील पाठिंबा दिला आणि पुण्यामध्ये शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक करण्याचे ठरले. ग्वाल्हेरचे आलिजा बहाद्दूर माधवराव शिंदे, देवासचे महाराज तुकोजीराव पवार आणि बडोद्याचे खासेसाहेब जाधव ही सर्व मंडळी या कामी मसलतीस लागली.

या स्मारकासाठी आणि शिक्षण संस्थेसाठी पुण्याच्या भांबुर्डा या गावी साडेसात एकर जमीन एक लक्ष रुपये किंमतीस खरेदी करण्यात आली.  हे भांबुर्डा गाव म्हणजे पुण्यामधील आजचे शिवाजीनगर. या अनुषंगाने स्मारकासोबत शिक्षण संस्था असावी म्हणून शाहू महाराजांचे सहाय्यक बाबुराव जगताप यांनी शिवाजी मराठा सोसायटी ची स्थापना केली. अर्थातच या संस्थेचे अध्यक्ष व आश्रयदाते खुद्द शाहू महाराज होते. हि शिक्षण संस्था आज ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी (AISSMS) या नावाने ओळखले जाते. याबाबतची घोषणा जरी शाहूमहाराजांनी सन 1917 साली केली असली तरी या स्मारकाचे भूमिपूजनास 1921 साल उजाडले. स्मारक घोषणेनंतर तब्बल अकरा वर्षांनी म्हणजे 1928 साली पूर्ण झाले

स्मारकाबद्दल सर्व संस्थानिकांनी जेंव्हा ठराव केला तेव्हा असे ठरले की या स्मारकाचे भूमिपूजन तात्कालीन इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते व्हावे. 

छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज

तसे पाहता इंग्रज हे शिवरायांना राष्ट्रपुरुष मानत नसत. किंबहुना शिवाजी महाराज हे लुटारू आहेत अशी प्रतिमा इंग्रजांनी निर्माण केली होती. शिवाजी महाराजांना राष्ट्रीय हिरो बनवण्यात इंग्रजांना कुठलाही रस नव्हता. परंतु नुकतेच पहिले महायुद्ध संपले होते. त्यामध्ये मराठ्या संस्थानिकांनी आणि त्यांच्या सैन्याने इंग्रजांना भरघोस मदत केली होती. तेंव्हा इंग्रज या कार्यक्रमास नकार देणार नाहीत असा सर्वांचा होरा होता.  

प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड चे राजकुमार) 1921 मध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार होते. याच काळात गांधीजींचे असहकार आंदोलन जोरात सुरू होते. भारताचे तत्कालीन व्हाईसराय या स्मारकाचे भूमिपूजन प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते व्हावे  यासाठी तयार नव्हते. असहकार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या राजकुमाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना चिंता वाटत होती. तेव्हा शाहू महाराजांनी आपले सर्व राजकीय वजन वापरून व्हाईसराय यांना राजी केले.

भूमिपूजनासाठी मुहूर्त ठरला 19 नोव्हेंबर 1921 चा. ठरल्याप्रमाणे प्रिन्स ऑफ वेल्स च्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन झाले. या प्रसंगी प्रिन्स ऑफ वेल्स याने शिवाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढले.

शाहू महाराजांचे निधन आणि पुढील घडामोडी

दुर्देवाने पुढे इसवी सन 1922 मध्ये शाहू महाराजांचे निधन झाले. आता हे स्मारक उभारण्यात साठी संस्थानिकांपैकी शिंदे सरकार यांनी पुढाकार घेतला. याच काळात पुण्यामध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यावरून ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर गटांमध्ये राजकारण खूपच तापले होते. या काळात ब्राह्मणेतर पक्षामध्ये नव्या दमाचे तरुण सामील झाले होते. ब्राम्हणेतर पक्षाचा सर्व कारभार हा पुण्यात शुक्रवार पेठेतील जेधे मेन्शन इथून चालत असे. दिनकरराव जवळकर कोल्हापुरातून नुकतेच पुण्यात आल्यानंतर या गटात सामील झाले. या नव्या गटाने शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी श्री शिवस्मारक नावाचे साप्ताहिक देखील सुरू केले.

या सर्व घडामोडी चालू असताना 1925 दरम्यान माधवराव शिंदे व खासेराव जाधव यांचे देखील निधन झाले. शेवटी या स्मारकाची जबाबदारी शाहू महाराज यांचे चिरंजीव श्री राजाराम महाराज यांचेकडे आली. या स्मारकासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ब्राँझ धातूचा करण्याचे निश्चित केले. तो देखील अखंड. त्यांनी पुतळ्यासाठी दोन लक्ष रुपयांची तरतूद केली. पुतळ्याचे काम कुणाला सोपवावे असा प्रश्न पडला. तेंव्हा असे ठरले की हे काम परकीय शिल्पकारास न देता देशी शिल्पकारांस देण्यात यावे. काम मोठे अवघड होते. परदेशी कारागीर आणि कंपन्याकडेच असल्या अवघड कामाचे कसब आणि सामर्थ्य होते. आणि एवढा प्रचंड पुतळा ब्राँझ मध्ये ओतकाम करून तोपर्यंत कुणी बनवला नव्हता.

शिल्पकरांची निवड

शोध घेतला गेला. या कामासाठी दोन व्यक्तींची नावे समोर आली. आश्चर्य म्हणजे या दोन्ही मराठी व्यक्ती होत्या. एक होते श्री रावबहादूर गणपतराव म्हात्रे. आणि दुसरे होते श्री विनायक पांडुरंग उपाख्य नानासाहेब करमरकर. यापैकी म्हात्रे यांना शाहू महाराजांनी आश्वासन दिले होते की या स्मारकाचे काम त्यांना करायला मिळेल. तरी देखील राजाराम महाराज यांनी स्मारकाचे काम दोघांनाही वाटून दिले. शिवाजी महाराजांचा पुतळा रावबहादूर म्हात्रे यांनी करावा. तर पुतळ्याच्या खाली लागणारे शिल्पकृतींचे चार फलक(Panels) आणि चौथरा  (पेडस्टल) करमरकरांनी बनवावे असे ठरले. काम पूर्ण करण्याची मुदत ठरवण्यात आली एक वर्ष.

चौथऱ्याच्या (पेडस्टल)याच्या चारी बाजूंना जे चार फलक (पॅनल) लावले जाणार होते त्यावर देखील चार वेगवेगळी शिल्पे बनवली जाणार होती. उजवा आणि डाव्या बाजूचे फलक हे ९X५.५ फूट मापाचे आणि प्रत्येकी एक टन वजनाचे असणार होते. तर पुतळ्याच्या समोर आणि मागे लागणारे फलक हे ५.५X३ फूट मापाचे असणार होते. पुतळ्याच्या उजव्या बाजूच्या फलकावर शिवराज्याभिषेक सोहळा चित्रित करण्यात आला होता. डाव्या बाजूच्या फलकावर वणी-दिंडोरी च्या लढाई, ज्यामध्ये शिवाजी महाराजांनी दाऊदखानाचा पराभव केला होता, तो प्रसंग चित्रीत करण्यात आला होता. पुतळ्याच्या समोर लागणाऱ्या फलकावर संगमरवरा मध्ये आई भवानी शिवाजी महाराजांना तलवार देतांनाचा प्रसंग चितारण्यात आला होता. पुतळ्याच्या मागच्या बाजूच्या फलकावर कल्याणच्या खजिन्याचा प्रसंग (कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या प्रसंग) चितारण्यात आला होता.

फलकावरील वेगवेगळी दृश्ये   स्त्रोत – AISSMS

करमरकर यांना सोपवलेले काम त्यांनी मुदतीच्या आधी तीन महिने शिल्लक असतानाच पूर्ण केले. परंतु म्हात्रे यांचे काम मात्र अपूर्णच होते. यामुळे नाराज होऊन राजाराम महाराजांनी पूतळ्याचे काम देखील नानासाहेब करमरकर यांनाच दिले. इसवी सन 1928 साली शिवाजी महाराजांच्या जन्मास त्रिशताब्दी पूर्ण होणार होती. म्हणजेच तात्कालीन मान्य तिथीनुसार 1928 मध्ये शिवजन्मास 300 वर्ष पूर्ण होतील असे मानले जात होते. (शिवाजी महाराज यांच्या जन्माचे आज ज्ञात असलेले इ.स. १६३० हे वर्ष तेव्हा प्रचलित नव्हते अथवा ज्ञात नव्हते.) राजाराम महाराजांना स्मारकाच्या अनावरणासाठी हाच 1928 सालचा त्रिशताब्दी चा मुहूर्त  साधायचा होता. त्यामुळे हे काम कसेही करून जून १९२८ च्या आधी त्यांना पूर्ण करून घ्यायचे होते. 

पुतळ्याचे काम म्हात्रेंकडून काढून करमरकरांना दिल्यामुळे स्मारक समितीत दुफळी निर्माण झाली. यात मुख्यत्वे ब्राह्मणेतर गट हा म्हात्रेंशी सहानुभूती बाळगणारा होता. गमतीची गोष्ट म्हणजे तात्कालीन वर्तमानपत्रांनी देखील या दोन वेगवेगळ्या गटात विभागली गेली होती. ‘टाइम्स’,  ‘केसरी’ ही वर्तमानपत्रे करमरकरांच्या बाजूची होती तर ‘विविधवृत्त्त’ आणि ‘बॉम्बे क्रॉनीकल’ ही वर्तमानपत्रे गणपतराव म्हात्रे यांच्या बाजूची होती. या दुफळीत मुख्य वादाचा मुद्दा हा होता की शिवरायांचा पुतळा ब्राह्मणाने करावा का? पण या वादाकडे दुर्लक्ष करून करमरकर पुतळ्याचे कामात गढून गेले.

शिवस्मारकाचे आणि पुतळ्याचे काम करमरकरांना सोपवल्या नंतर काम वेगाने व्हावे म्हणून राजाराम महाराजांनी या सर्व कामासाठी आपल्या मुंबई येथील शिवतीर्थ बंगल्यातच यासाठी वेगळी जागा करमरकर यांना दिली. या बंगल्या मध्येच पुतळ्यासाठीची सर्व पूर्वतयारी करण्यात आली होती.

स्मरकाची पूर्वतयारी

स्मारक बनवण्यासाठी काय काय आव्हाने आली आणि पुतळा कसा तयार झाला याची रंजक कथा नानासाहेब करमरकरांनी ‘एका स्मारकाची जन्मकथा’ या पुस्तकात नोंदवली आहे. सर्वात प्रथम या पुतळ्यासाठी करमरकरांनी इतिहासाचा पुरेसा अभ्यास केला. त्यानुसार शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रस्तावित रूप निश्चित केले.त्यांनी विचाराअंती असे ठरवले की –

‘जो शिवाजी महाराज दाखवायचा, तो पूर्ण स्थिरस्थावर झालेला, ५० ते ५५ वयाचा, घोड्यावर सहज साधेपणे सहल करीत असलेला, कोठलाही डामडौल, शृंगार, धावपळ किंवा समर प्रसंग नसून, छत्रपती होऊन समाधानात राज्य करीत असलेला, घोड्यावर पूर्ण ताबा व घोडाही आज्ञाधारक, शांत अवस्थेत दिसावा.’

आधी साडेतीन फुटांचे (3.5) मातीचे छोटे मॉडेल बनवले. त्यासाठी राजाराम महाराजांच्या पदरीचा शहानवाज नावाचा अरबी घोडा वापरण्यात आला. हा घोडा होता कोल्हापुरास. परंतु या कामासाठी हा घोडा खास कोल्हापुराहुन मुंबईस मागवण्यात आला. हे मॉडेल स्मारक समितीने पसंत केल्यावर मोठे मॉडेल साडेतेरा फूट उंच, तेरा फूट लांब व साडेतीन फूट रुंद या मापाचे करण्याचे ठरले. त्यासाठी पुन्हा एकदा वास्तवीक पुतळ्याच्या मापाचे (१३.५x१३x३.५फुट) अजून एक माॅडेल बनवन्यात आले.

तांत्रिक अडचणी

एवढा मोठा पुतळा. तो देखील धातूचा (ब्राँझचा),  आणि ओतिवकाम (casting) करुन बनवणे.   खरोखरच खुप अव्हानात्मक आणि अवघड काम होते. अशा पुतळ्यासाठी एक भलाथोरला साचा बनवावा लागतो. शक्यतो एवठ्या मोठ्या आकाराचे  पुतळे जेव्हा बनवायचे असतात तेव्हा शक्यतो कुणी  एकसंध बनवत नाहीत. एक संपूर्ण पुतळा ओतकाम करुन बनवायचे जोखिम कुणी सहसा घेत नाही. ते पुतळ्याचे वेगवेगळे भाग पाडतात. त्यानां स्वंतत्र रितीने  बनवुन घेतात. त्यानंतर हे सर्व भाग जोडुन त्यापासुन पुर्ण पुतळा बनवला जातो. आजच्या आधुनिक तंत्रज्ञाच्या काळात देखील असा पुतळा बनवणे आव्हानात्मक आहे. यामध्ये अनेक समस्या येऊ शकतात. धातुच्या रसाचे तापमान व्यवस्थीत नियंत्रीत करावे लागते.धातु सगळीकडे  न पसरणे, पुतळ्याच्या अंतर्गत भागात बुडबुडे किंवा पोकळी राहणे, मुर्तीस तडा जाणे यासारख्या समस्या उद्दभवतात. आणी हा पुतळा बनवायचा होता १९२० च्या दशकात. म्हणजे आजपासुन जवळपास १००वर्षापुर्वी. त्या काळात असा पुतळा उभा करणे खरे तर तांत्रिक आव्हानच होते. 

एवढे मोठे ओतकाम करण्यासाठी यंत्रसामुग्री आणि सुविधा देखील तेव्हा सहजासहजी उपलब्ध नव्हती. अनेक कंपन्यांकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा एवढी मोठी फाऊंड्री ( धातु ओतकामची रसशाळा) कुठेच उपलब्ध नव्हती. शेवटी बराच माग काढल्यानंतर असे कळले कि मॅकेगान अँड मॅकेन्झी कंपनीच्या फाऊड्रीमध्ये असे काम केले जाऊ शकते. हि कंपनी मुंबईतील माझगाव डाॅकमध्ये स्थीत होती. येथे युध्दनौका व मोठमोठ्या जहाजांची उभारणी केली जात असे. शेवटी पुतळा इथेच ओतण्याचे ठरले. परंतु कंपनीने असे कलात्मक काम कधी केलेले नव्हते. तेव्हा हे काम करमरकरांच्या मार्गदर्शना खाली कंपनीच्या अनुभवी कामगारांकडुन करवून घेण्यात  यावे असे ठरले.

नानासाहेब करमरकर

करमरकरांसाठी तर हे काम प्रचंड आव्हानात्मक आणि जबाबदारीचे बनले होते. ‘एका स्मारकाची जन्मगाथा’ या पुस्तकात या पुतळ्याच्या निर्मितीची कथा आहे. या पुस्तकात ते वर्णन करतात-

“घोड्यावरचा पुतळा एकसंघ ओतणे हे अत्यंत अवघड काम आहे. आणि तेही शिवाजी महाराज स्मारकाचे. चुरशीची स्पर्धा, शत्रूचे जाळे, पूर्वी कधी न केलेले काम, बिघडले तर किंवा वेळेवर न झाले, तर सर्व पैसे परत करणे ही अट. अशा परिस्थितीत साडेतेरा फुटांचा घोड्यावरचा एकसंध पुतळा ओतण्याचे धाडस इरेला पडून अंगावर घेऊन करणे म्हणजे धंद्याची अब्रू पणाला लावण्यासारखे होते. त्यावेळी ते धैर्य कसे झाले, याचे मला आता आश्चर्य वाटते.”

दोन्ही गटाचे (म्हात्रे गट आणि करमरकर गट) पाठराखण करणारी वर्तमानपत्रे होती हे आपण या आधी पाहिले आहे. म्हात्रे गटाच्या वर्तमानपत्राचे वार्ताहर पुतळ्याच्या निर्मितीवर बारिक लक्ष ठेवुन होते. पुतळ्याच्या कामाबद्दल नकारात्मक रिपोर्ट बनवत होते. करमरकरांच्या विरोधातील ही वृत्तपत्रे ( ‘विविधवृत्त’  आणि ‘बाॅम्बे काॅनिकल’) पुतळ्याच्या निर्मितीबाबत वावड्या उठवत होते. ‘कामाचा विचका होणार ‘, माॅडेल्स तुटले,’ ‘करमरकरांकडुन पुतळा वेळेवर बनने अशक्य’, ‘म्हात्रेनी आपला पुतळा तयार ठेवावा’ या छापाच्या बातम्या ही वृत्तपत्रे देऊ लागली. या सर्वकडे ध्यान न देता करमरकर यांचे काम चालु होते. 

पूतळ्याचा जन्म

शेवटी या पुतळ्याच्या ओतकामाचा मुहुर्त ठरला. १ जुन१९२८. माझगाव डॉक मध्ये काम सुरू झाले. त्या दिवशी भट्टीच्या आगीची धग पाहुन बघणारांना असे वाटले की जणु माझगाव डाॅक मध्ये मोठी आग लागली आहे. महामुकादम रासमिसन नावाचा गृहस्थ होता. त्याच्या हुकुमानुसार १५० कामगार, सैनिकाप्रमाणे कामावर तुटुन पडले. करमरकरांच्या मनासारखे काम झाले. धातुच्या रसाचे तापमान, ओतकाम  थंड होणे इत्यादी गोष्टीही अपेक्षेप्रमाणे जुळुन आल्या. करमर मात्र हे काम पुर्ण होईपर्यत अत्यंत अस्वस्थ होते. ते लिहीतात.

“शेवटी भट्टी लागली, ब्राँझ धातूचा १६ टन रस ओतला गेला. शुक्रवार १ जून १९२८ चा दिवस आणि रात्र माझ्या जीवनाची भवितव्यता ठरवणारी होती. भवितव्य पाताळात तरी गाडणार किंवा स्वर्गात तरी नेणार, अशा धारेवर उभे होते.”

दुसर्या दिवशी दोन्ही गटाच्या वर्तमानपत्रांनी बातम्या छापल्या. करमरकर समर्थक टाइम्सने ‘कास्टींग ग्राॅड सक्सेस’ छापले. तर त्यांच्या विरोधी व म्हात्रे समर्थक क्राॅनिकल ने ‘कास्टींग फेल्युअर’ आशी बातमी छापली. परंतु ओतकाम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेंव्हा क्रेनव्दारे पुतळा बाहेर काढला त्याबद्दल करमरकर लिहतात. 

“याच्या दुसऱ्याच दिवशी क्रेनने पेट्यांच्या मुशीमधून शिवाजी महाराज वर उचलले, तेव्हा जणू काय चमत्कार झाल्याप्रमाणे नजर लावून सर्व पाहत होते. पुतळा जमिनीवर उभा केला, तेव्हा धातू चकचकत होता. वाफेच्या लाटा पुतळ्यातून निघत होत्या. जणू काय शिवाजी महाराज घामाने थवथवत अग्निकुंडातून दिव्य करून वर आले आहेत व घोड्यावरून दौड करू लागले आहेत, असे दिसत होते.”

पुतळा तर उत्कृष्ठ तयार झाला. परंतु अजुन एक मोठे आव्हान आ वासुन समोर उभे होते. ते म्हणजे हा पुतळा पुण्यास पोचवायचा कसा? एवढा मोठा पुतळा वाहतुक करण्याची सोय तेव्हा उपलब्ध नव्हती. पुतळा बनला माझगाव डाॅक(मुंबई) ला आणि तो आणायचा होता पुण्यातील भांबुडर्यास. म्हणजे पुण्यातील आजच्या  शिवाजीनगरला.  हा पुतळा कसा आणावा यावर बराच विचार झाला. हा पुतळा समुद्रमार्गे आणणे शक्य आहे का याचा विचार झाला. समुद्र मार्गे रत्नागीरिस पुतळा आणुन नंतर तो पुण्यास आणावा असा एक पर्याय सुचवण्यात आला. परंतु तो व्यवहार्य नव्हता. मुंबई – पुणे लोहमार्ग हा एक पर्याय होता. शेवटी बराच खल होऊन असे ठरले कि हा पुतळा रेल्वेमार्गाने पुण्यास पोचवायचा. 

पुण्यास प्रयाण

परंतु यातही एक तांत्रिक अडचण होती. पुतळ्याची उंची होती साडेतेरा (13.5) फुट. तर मुंबई-पुणे लोहमार्गावरील सगळ्यात कमी उंचीच्या बोगद्याची उंची होती साडेनऊ (9.5) फुट. त्यातही रेल्वेच्या ज्या वाघिणीवर (Wagon) पुतळा उभा ठेवायचा तिची उंची होती तीन (3.0) फुट. यावर उपाय म्हणुन गरजेनुसार खास वाघीण (Wagon) बनवण्यात आली. या नव्या वाघीणीची उंची होती १ फुट. पुतळा वाघिणीवर ठेवल्यावर पुतळ्यांची उंची साडे चौदा (14.5) फुट भरत होती. आणि बोगदा तर ९ १/२ फुट उंचीचा होता. बरे पुतळा झाकुन (packing) करुन आणणे सोयीचे नव्हते. त्यामुळे त्याची उंची अजूनच वाढली असती. त्यामुळे पुतळा उघडाच वॅगनवर ठेवावा असे ठरले.  पण पुतळ्यासहित wagon बोगद्यातून बाहेर काढायची कशी? 

यावरही शक्कल शोधण्यात आली. ती म्हणजे जिथे बोगदा येईल तिथे वाघिणीवर पुतळ्यासोबत असणारे कामगार पुतळ्यास तिरपे करत असत. एवढे करुनही पुतळा व बोगदा यात केवळ ३ इंचाचे अंतर राहत असे. अशा मनावर दडपणाच्या अवस्थेत पुतळा वाघीणीवर स्वार होऊन पुण्याकडे निघाला. पुतळा उघडा ठेवला असल्यामुळे ही काय गंमत आहे हे बघण्यासाठी लोकांची दुतर्फा गर्दी नक्कीच झाली असती. त्यामुळे रहदारीस अडथळा झाला असता.  यावर उपाय म्हणुन दोन्ही बाजुची रहदारी थांबवून ठेवण्यात आली होती. शेवटी अशा प्रकारे हि ऐतिहासिक यात्रा करत पुतळा १० जुन १९२८ ला पुण्यास पोहचला. स्टेशनपासुन या पुतळ्याची वाजतगाजत मिरवणुक काढण्यात आली. या वेळी मुंबई प्रांताचा गवर्नर होता लेस्ली विल्सन याने पुतळा बघुन करमरांच्या कामाचे कौतुक केले.

पुण्यामध्ये, मोठ्या धामधुमित, गवर्नर लेस्ली विल्सनच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण १५ जुन १९२८ ला करण्यात आले.

शिवाजी महाराजांचा पहिलं पुतळा     स्त्रोत – AISSMS

स्मारकाचे महत्व

आजही हे स्मारक वैशिष्ठपुर्ण मानले जाते. सर्वात प्रथम कारण म्हणजे हा शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा आहे. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे एकसंघ बनवण्यात आलेल्या जगातील मोजक्या मोठ्या धातूंच्या पुतळ्यांपैकी तो एक आहे. यानंतर बनवण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या स्मारक, पुतळे, मूर्तींवर या पुतळ्याचा प्रभाव जाणवण्ल्याशिवाय राहत नाही. आणि शक्यतो कुणी फारसा ध्यानात न घेतलेला सर्वात महत्वाचा आणि वेगळा मुद्दा म्हणजे हे स्मारक अस्सल एतद्देशिय माणसांनी बनवलेले आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे मराठी माणसांनी बनवले आहे. एका वेगळ्या प्रकारे हे मराठी जिद्दीचे, कौशल्याचे आणि तांत्रिक उत्कृष्ठतेचे देखील स्मारक आहे. केवळ पुतळ्याच्या सुबकतेला आणि सौंदर्याला बघून गवर्नर लेस्ली विल्सन याने त्याची प्रशंसा केली नाही. तर त्याच बरोबर ती प्रशंसा, एवढी भव्य कलाकृती, एकही चूक न करता, युरोपच्या तोडीस तोड तांत्रिक कौशल्याने साकारली, त्या तांत्रिक कौशल्यास त्याने दिलेली ती सलामी देखील होती.

आजही हा पुतळा पुणे शहरात दिमाख्यात उभा आहे. आजही तो कुणालाही बघता येईल. पुतळा बनल्यानंतर काही वर्षानी राजाराम महाराजांनी स्मारकाच्या परिसरात श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कुल (SSPMS) सुरु केले. हे स्मारक आणि हि संस्था शिवाजीनगर परिसरात मोठ्या दिमाख्यात उभी आहे. शिवाजीनगर (पुणे) येथुन शनिवारवाड्याच्या रस्त्याने निघल्यावर (COEP College Ground च्या बाजुला हि संस्था आणि स्मारक उभे आहे) न्यायमुर्ती रानडे मार्गाने या स्मारकास जाता येईल. शिवाजीनगर बस स्थानकापासून पायी जाता येईल एवढ्या अंतरावर हे स्मारक आहे. अचुकतेसाठी या स्थानाचा Google map loction शेअर करत आहे. 

पुढच्या वेळेस जेंव्हा पुण्यास (शिवाजीनगरास) जाल तेंव्हा वेळात वेळ काढून आवर्जुन या स्मारकास भेट द्या.

1 thought on “First Statue of Shivaji Maharaj in world शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे उभारला?”

  1. नितीन शिंदे

    अतिशय सुंदर लिखाण हा लेख वाचून खूपनवीन माहिती मिळाली 🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: