Mama Shree मामाश्री

मामांश्रींशी आमची पहिली ओळख आणि भेट तशी पाटील कॉलनीतच झाली. (खरं तर ते माझे काकाश्री. पण शिंदे परिवारातील सगळे मामाश्री म्हणायचे म्हणून मी देखील मामाश्री म्हणतो.) नंतर उस्मानपुऱ्यात होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमात, निवांतपणे होणाऱ्या भेटींमध्ये मग मामाश्री हळू हळू समजायला लागले. वयस्कर पण शरीरावर वयाचा प्रभाव न जाणवू देणारी अंगकाठी, साधी पण समोरच्याच्या अंतःकरणात उतरून ठाव घेणारी भेदक नजर, आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसोबत संवाद साधू शकणारी बोलण्याची भाषा. मामांना प्रथम दर्शनी पाहणाऱ्यांना देखील या गोष्टी जाणवत असाव्यात.

कुठल्याही कार्यक्रमात, समवयस्क जेष्ठ मंडळींमध्ये गप्पा मारत बसलेले असतांना देखील आमच्या तरुण पिढीतील कुणाशीही संवाद साधणारे मामा म्हातारे आहेत, बुजुर्ग आहेत असे आम्हाला कधी वाटले नाही. मामांचा स्वभाव तसा सरळ. मामांना तोंडदेखलेपणा आवडत नव्हता. कोण माणूस मनापासून बोलतोय, विचारपूस करतोय आणि कोण फक्त शिष्टाचार म्हणून बोलतोय हे मामा लगेच ओळखायचे. त्यांच्या संपर्कात येणाऱ्याला ही अवघड परीक्षा पास करावीच लागे. मामा एखादया नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीशी बोलताहेत, गप्पा मारताहेत असे जर तुम्हाला दिसले तर खुशाल समजावे की ती व्यक्ती मामांच्या परीक्षेत पास झाली आहे.

स्वतंत्र बाणा आणि प्रसंगी त्यासाठी किंमत मोजावी लागली तरी ती मोजण्याची तयारी असा मामांचा स्वभाव. जी गोष्ट पटत नाही ती करायची नाही मग भले घरच्या मंडळींचा विरोध असला तरी, या निर्धारामुळे मामांनी तरुणपणीच घर सोडले आणि औरंगाबादला आपले स्वतंत्र बस्तान हलविले. कुठून काही सहाय्य मिळेल याची शाश्वती नसतांना मामांनी एक पाऊल आयुष्याच्या वाटेवर जे पुढे  टाकले तोच पुढे आयुष्यभर त्यांची वाटचाल बनले. नोकरी सहज मिळाली असती अशा कालखंडात मामांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला. कष्ट करायची तयारी, उपजत बुद्धी, नवीन शिकण्याची हौस याच्या जोरावर तो समर्थपणे चालवला, वाढवला देखील. या त्यांच्या प्रवासात कुसुम आत्यांनी घरची आघाडी खंबीरपणे सांभाळली आणि कंबर कसून आपला संसार समर्थपणे सांभाळला. मुलांनी देखील आपल्या आई वडिलांचे कष्ट व त्याग पहिले. त्यांना त्याचे वेगळे संस्कार करायची गरज पडली नसावी. मामांचा आणि आत्यांचा हा सगळा खडतर जीवन प्रवास खरं तर आवर्जून माहिती करून घ्यावा असाच आहे. 

जुन्या पिढीतील ज्या काही कर्तृत्व वान लोकांना आमची पिढी ओळखते त्यात मामा आहेतच. माणसाच्या यशाचे मोजमाप जर ‘अपत्ये कशी निपजली?’ या कसोटीवर करायचे म्हटले तरी मामा आणि आत्या यांचा संसार या बाबतीत अत्यंत यशस्वी म्हणावा लागेल. राजश्री ताई, संगीता ताई आणि अनिल भाऊ ही तीनही आपत्य उच्चशिक्षित आणि आपापल्या क्षेत्रात चांगल्या पातळीवर प्रस्थापित आहेत. आत्या आणि मामाश्रींचा संसाराची इतिकर्तव्यता तशी पूर्ण झालेली होती. जेव्हा आपल्या आयुष्याची सर्व कर्तव्ये पार पाडली आहेत, चरितार्थासाठी काहीच करायची आवश्यकता नाही. संसाराची सर्व व्यवस्था लावून झालेली आहे अशा परिस्थितीत वयस्कर माणसाने स्वतःसाठी वेळ खर्च केला, किंवा आरामखुर्चीत बसून निवांत आयुष्य घालवले तर त्याला कुणी नाव ठेवले नसते. पण मामाच्या संसाराचे घोडे असे गंगेत न्हालेले असून देखील मामा शांत बसले नाहीत. आयुष्यभर आपल्या मनगटाच्या आणि घामाच्या जोरावर ज्यांनी आपले आयुष्य उभे केले आशा व्यक्तींना स्वस्थ बसणे आवडत नाही. मामांनाही आवडत नसावे. म्हणूनच रिकामे बसल्यापेक्षा आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा तरुण पिढीला देण्यासाठी मामांनी JNEC मध्ये परत एक यशस्वी second inning पूर्ण केली. मनाने जिंदादील आणि तरुण असणाऱ्या मामांना तरुण पोरांशी संवाद साधायला आवडत असावे. मामांच्या अनुभवाचा फायदा या तरुण इंजिनिअर्स ना झाला असेलच. पण मामांचा या वयातला उत्साह आणि उमेद पाहून त्यांना नक्कीच उभारी मिळली असेल. ती कुठल्या कॉलेज च्या अभ्यासक्रमात शिकून मिळत नसते.

अशात, काही दिवसांत, अधून मधून मामाच्या तब्येतीविषयी अपडेट कळायचे. आत्ताच काही दिवसांपूर्वी मामांची भेट हडको तील घरी झाली. सर्व परिवार जनांनी मला सांगितले होते की आताशा मामांची तब्येत काही ठीक रहात नाही. लॉक डाऊन काळात कुणाशी भेटनेही झाले नव्हते. आत्यांनाही भेटायचे होते. म्हणून मग मुद्दामहून भेटायला गेलो. घरी गेलो. पाहतो तर काय? मामा गादी वरती निवांत रेलून टीव्ही पहात बसलेले. भजन, प्रवचन नाही. तर बातम्या पहात बसलेले. जान्हवी आजी आजोबांची चांगलीच काळजी घेत होती. म्हातारपणात अशा अनेक वृद्धांना त्यांच्या आजारपणात मी हताश झालेले पाहिले आहे. वैताग, त्रागा, शारीरिक आजारामुळे वतागलेल्या चेहर्यावर “सुटलो कायमचा यातून तर बरं होईल!” असा भाव असतो. काहींना दुसऱ्या दुनियेचे वेध लागलेले असतात. काही जण आपल्या सर्व जाणीवा, संवेदना आणि चित्तवृत्ती बाह्य जगापासून तोडून, आत्ममग्न, मृत्यूची वाट पहात घालवतात. पण मामाश्री मध्ये याचा कसलाही लवलेश नव्हता. “आयुष्याची संध्याकाळ झाली म्हणून काय कुढत जगू? छे! छे! शक्य नाही. मृत्यू जेंव्हा यायचा असेल तेंव्हा येईल. त्याला असा सहज सामोरा जाईल.” असा जणू मामांचा एकूण अविर्भाव होता. अन्नसेवन जवळ जवळ बंद झालेले होते. पण मनाच्या निग्रहाने शरीरावर ताबा मिळवलेला प्रत्यक्ष बघायला मिळत होता. निरोप घेऊन निघालो तेंव्हा कुठेतरी वाटले की, आता प्रत्यक्ष भेट पुन्हा कधी होईल की नाही?

पण नंतर दोनच दिवसांनी मामाश्री, आत्या जान्हवी अहमदाबादला गेले. विमानतळावर चा मामांचा फोटो पहिला. मामांचा swag बघण्यासारखा होता. वाटले की, मामांना काहीही धाड भरलेली नाहीये. चांगले ठणठणीत बरे आहेत ते. देवाच्या मनात असलं तर कुणास ठावूक? मामा सहस्त्र चंद्र दर्शन देखील करतील. पण बहुधा देवाच्या मनात नव्हते.

शेवटी एक वाटतं. आयुष्य जगण्याविषयी मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे,

“सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत, की गाणं म्हणत?
तुम्हीच ठरवा”

मला वाटतं, मामाश्रींचं आधीपासूनच ठरलेलं होतं. गाणं म्हणत जगायचं! Anyway, मामाश्री तुमची एक्जिट जरा थोडी अनपेक्षितच झाली. तुम याद आते राहोगे.

गुडबाय मामाश्री!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: