आजच्या नव्या पिढीतील अनेक जणांना एकत्र कुटुंब पद्धती काय होती हे माहिती असण्याचा संभव फार कमी आहे. ग्रामीण भागात ज्याला खटल्याचं घर म्हटलं जायचं अशी घरे अगदी काल परवापर्यंत अस्तित्वात होती. आता तुरळक अशी घरं, कुटुंबं आढळत असली तरी प्रमाण फार कमी आहे. गावांपेक्षा शहरांमध्ये तर हा प्रकार नामशेष झाला आहे. आशा एकत्र कुटुंबात राहणाऱ्या कुटुंबियांचे सर्व व्यवहार हे सामायिक असायचे. अशा एकत्र कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींना काही गोष्टींचा लाभ होता तसे त्यात काही झळही सोसावी लागत असे.
अशाच एका कुटुंबात एक मुलगी जेंव्हा नववधू म्हणून जाते. सहाजिकच तिला तिथे जुळून घेण्याला त्रास पडतो. आणि मग ती फक्त नवरा-बायको असं वेगळं राहायचं खूळ डोक्यात घेते. आणि एक एक करून एकत्र कुटुंबातल्या समस्यांचा पाढाच सांगायला सुरुवात करते. शेवटी नवर्याला पटवून ती वेगळं राहायला जाते. वेगळं राहायला लागल्यावर तिला अनेक समस्या येतात. आणि मग वेगळं राहण्यामधील सुख याबाबतीत तिचा अपेक्षा भंग कसा होतो याचे मजेदार वर्णन मो. दा. देशमुख किंवा मोरेश्वर देशमुख यांनी आपल्या ऊन ऊन खिचडी या कवितेत आपल्याला केले आहे. एकत्र कुटुंबात वाढलेल्या आणि एकत्र कुटुंब काय असतं हे माहीत नसणाऱ्या अशा दोन्ही लोकांना ही कविता आवडेल अशी आशा आहे. कृपया आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
ऊन ऊन खिचडी सजूकसं तूप वेगळं व्हायचं भारीच सुख एक नाही दोन नाही माणसं बारा घर कसलं मेलं ते? बाजारच सारा सासूबाई, मामांजी, नंनंदा नि दीर जावेच्या पोराची सदा पीरपीर पाहुणे रावळे सण अन वार रांधा वाढा जीव बेजार दहात दिलं ही बाबांची चूक वेगळं व्हायचं भारीच सुख म्हणतात सारे तू भाग्याची फार भरलं गोकुळ तुझा संसार जगाला काय कळे सुख ते माझं इच्छांचं मरण अन कामाचं ओझं मला काही आणलं की ते साऱ्यांनाच हवं ह्यांच्या पगारात ते कसं बरं व्हावं? नटण्या फिरण्याची भागेना भूक वेगळं व्हायचं भारीच सुख सगळे म्हणतात तुझं घर मोठं प्रेमळ प्रेमळ प्रेमळ, तुझं घर मोठं प्रेमळ प्रेमळ प्रेमळ तरी सासू ती सासूच एव्हडासा झाला तरी विंचू तो विंचूच चिमुरडी ननंदबाई चुगलीत हलकी वितभर लाकडाला हातभर ढिलपी बाबांची माया काय मामांजीना येते? पाणी तापवले म्हणून साय का धरते? बहीण अन जाऊ यात अंतरच खूप वेगळं व्हायचं भारीच सुख दोघांचा संसार म्हणजे सदा दिवाळी-दसरा दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा दोघांनी राहायचं गुलूगुलू बोलायचं खूप खूप फिरायचं छान छान ल्यायचं आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी फिटतील साऱ्या बाई आवडी निवडी स्वयंपाक तरी काय? पापड मेतकूट दह्यावरची साय जेवणाची लज्जत राहिलंच खूप ऊन ऊन खिचडी साजूकसं तूप रडले पडले अन अबोला धरला तेंव्हा कुठे वेगळा संसार मांडला पण मेलं मला काही कळतंच नाही महिन्याचा पगार मेला कसा पुरतच नाही साखर आहे तर चहा नाही तांदूळ आहे तर गहू नाही कसल्या हौशी अन कसल्या आवडी? बारा महिन्याला एकचं साडी आज नाही उरलं कालचं रूप ऊन ऊन खिचडी सजूकस तूप यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी पेलाभर पाणी द्यायला बायकोच हवी बाळ रडला तर खापायचं नाही क्षणभर जरा त्याला घ्यायचंही नाही स्वयंपाक करायचा मीच, भांडीही घासायची तीही मीच ह्यांचीही मर्जी सांभाळायची मीच जिवाच्याही पलीकडे काम झालंय खूप ऊन ऊन खिचडी सजूकस तूप सासूबाई होत्या, पण बऱ्याच होत्या सकाळचा स्वयंपाक निदान करत तरी होत्या मामांजी दिवसभर बाळाला घ्यायचे बाजार करायला भावोजी जायचे कामात जावेची मदत व्हायची मोठ्या भाऊजींनी सारी उर नि पूर पहायची पण आत्ता काय? थंडगार खिचडी अन संपलंय तूप अन वेगळं राहायचं कळलंय सुख