वामांगी Vamangi by Arun Kolatkar

देवळात गेलो होतो मधे
तिथे विठ्ठल काही दिसेना
रखुमाय शेजारी 
नुसती वीट
मी म्हणालो 
असु दे
रखुमाय तर रखुमाय
कुणाच्या तरी पायावर 
डोकं ठेवायचं
पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढेमागे
लागेल म्हणून
आणि जाता जाता सहज
रखुमायला म्हणालो
विठू कुठे गेला
दिसत नाही
रखुमाय म्हणाली
कुठं गेला म्हणजे?
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला?
मी परत पाहिलं
खात्री करून घ्यायला
आणि म्हणालो 
तिथं कुणी नाही
म्हणते, 
नाकासमोर बघण्यात 
जन्म गेला
बाजूचं मला जरा
कमीच दिसतं
दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं 
जरा होत नाही
कधी येतो, कधी जातो
कुठं जातो, काय करतो
मला काही काही
माहिती नाही
खांद्याला खांदा भिडवून
नेहेमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले
आषाढी कार्तिकीला 
इतके लोक येतात नेहेमी
मला कधीच कसं कुणी
सांगितलं नाही
आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
अठ्ठावीस युगाचं
एकटेपण
-अरुण कोलटकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: